साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
साखरवाडी (ता. फलटण) येथे बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट तयार करून त्यावर खामगाव, बुलढाणा येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ब्रम्हानंद टाले यांच्या नावाचा व सहीचा दुरुपयोग केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, आणखी एका संशयिताचा शोध लागला आहे. शंकर ज्ञानदेव खलसे (रा. इंदापूर, ता. इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील संशयित डॉ. बी. जे. राऊत व प्रतिभा साळुंके हे मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धन्वंतरी लॅबोरेटरीचा चालक विशाल नाळे याला दि १२ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दि १६ रोजी पोलिसांनी शंकर ज्ञानदेव खलसे (रा. इंदापूर, ता. इंदापूर) यालाही अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणात साखरवाडी येथील डॉ. बी. जे. राऊत व प्रतिभा साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांना नवीन संशयिताचा शोध लागला असून त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.तक्रारदार डॉ. टाले यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, ते २००५ पासून खामगाव येथील धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीत अधिकृत चाचण्या करून अहवाल देत आहेत. इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांना काही संशयास्पद लॅब रिपोर्ट दाखवले. तपासल्यावर हे लक्षात आले की त्या रिपोर्टवर “Dr. B. T. Tale, MBBS MD Pathology, Reg. No. 87125” असे नाव व खोटी सही छापलेली होती. प्रत्यक्षात डॉ. टाले यांचा खरा नोंदणी क्रमांक 1125 आहे. या खोट्या रिपोर्टवर विशाल नाळे याचे नावही छापलेले होते.पोलिस तपासानुसार हे रिपोर्ट खोटे तयार करून रुग्ण व इन्शुरन्स कंपन्यांना देण्यात आले होते. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.फलटण पोलिसांनी नाळे व खलसे यांना अटक केली असून, इतर दोघांचा तपास सुरू असून लवकरच या दोघांनाही अटक करू असे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी सांगितले दरम्यान नागरिकांकडून या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी होत आहे.